इंग्लिश प्रीमियर लीग
From Wikipedia
अनुक्रमणिका |
[संपादन] इतिहास
१९८० च्या दशकात इंग्लिश फुटबॉलची रया गेली होती. मैदानांची दुरावस्था, प्रेक्षकांसाठी अपुऱ्या सुविधा आणि प्रेक्षकांची हुल्लडबाजी यामुळे इंग्लिश क्लब्जना युरोपियन स्पर्धांमधे भाग घेण्यास मनाई करण्यात आली होती. इ.स. १८८८ पासून सर्वोत्तम आणि सर्वांत लोकप्रिय समजला जाणारा 'फुटबॉल लीग फर्स्ट डिव्हिजन' हा लीग इटालीच्या सेरी आ आणि स्पेनच्या ला लीगा च्या तुलनेत बराच मागे पडला. याच दरम्यान अनेक इंग्लिश खेळाडूंनी इतर युरोपियन क्लब्जबरोबर करार करण्यास सुरुवात केली. परंतु १९९० च्या दशकाच्या सुरुवातीस ह्या परिस्थितीत चांगला बदल होण्यास सुरुवात झाली. इंग्लंडच्या संघाने इ.स. १९९० च्या फुटबॉल विश्वचषकात उपांत्य फेरीत धडक मारली. याच काळात यु.ए.फा. या युरोपियन फुटबॉल संघटनेने इंग्लिश क्लब्जवरील बंदी उठवली.
[संपादन] स्थापना
इ.स. १९९१ च्या मोसमाच्या अखेरीस एका नव्या लीगच्या स्थापनेचा प्रस्ताव पुढे आला. १७ जुलै १९९१ रोजी खेळातील सर्वोत्कृष्ठ क्लब्जसाठी एफ. ए. प्रीमियर लीगची स्थापना झाली. ही नवी साखळी व्यवस्थापन आणि प्रसारण हक्क, प्रायोजक इ. साठी एफ. ए. (फुटबॉल असोसियशन) पासून पूर्णतः स्वायत्त होती.
[संपादन] सुरुवातीचा मोसम
लीगचा पहिला मोसम १९९२-९३ हा ठरला. या लीगमध्ये एकूण बावीस क्लब्जच्या संघांचा समावेश होता. ब्रायन डीन याने प्रीमियर लीगमधला पहिला-वहिला गोल मॅंचेस्टर युनाइटेड विरुध्द झळकावला.
[संपादन] स्पर्धेचे स्वरूप
प्रतिवर्षी प्रीमियर लीग या उच्च श्रेणीत एकूण २० क्लब्सची निवड होते. प्रत्येक क्लब इतर १९ क्लब्सविरुध्द एक सामना घरच्या प्रेक्षकांसमोर आणि एक प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर, असे दोन सामने खेळतो. संपूर्ण मोसमात अशा प्रकारे प्रत्येक संघास ३८ सामने खेळावे लागतात. विजयासाठी ३ गुण, बरोबरीसाठी १ गुण आणि पराभवासाठी शून्य गुण बहाल केले जातात. एकूण गुणांच्या आधारावर संघांची क्रमवारी निश्चित केली जाते. गुणांची बरोबरी झाल्यास केलेले आणि स्विकारलेले गोल यांच्या फरकाद्वारे क्रम निश्चित केला जातो. मोसमाच्या अखेरीस सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या संघास इंग्लिश प्रीमियर लीगचे विजेतेपद मिळते. इंग्लिश प्रीमियर लीगमधील सर्वोत्तम ४ संघ यु. ए. फा. चॅंपियन्स लीगसाठी पात्र ठरतात.
[संपादन] प्रमुख खेळाडू
[संपादन] प्रमुख संघ
- चेल्सी
- मॅंचेस्टर युनाइटेड
- टॉटेनहॅम हॉटस्पर
- लीव्हरपूल
- बोल्टन
- आर्सेनल
- न्यूकॅसल युनाइटेड
- वॅटफोर्ड
- चार्लटन
- फुलहॅम
- ऍस्टन व्हिला
- रेडिंग
- एव्हर्टन
- विगन ऍथलेटिक
- वेस्टहॅम युनाइटेड
- शेफिल्ड युनाइटेड
- मॅंचेस्टर सिटी
- मिडल्सब्रो
- पोर्टस्मथ
- ब्लॅकबर्न रोव्हर्स
[संपादन] स्पर्धेचे गतविजेते
गेल्या १४ वर्षांत मॅंचेस्टर युनाइटेड या क्लबने ८ वेळा, आर्सेनल या क्लबने ३ वेळा तर चेल्सी या क्लबने २ वेळा विजेतेपद पटकावले आहे.
| मोसम | विजेता क्लब |
|---|---|
| २००५-०६ | चेल्सी |
| २००४-०५ | चेल्सी |
| २००३-०४ | आर्सेनल |
| २००२-०३ | मॅंचेस्टर युनाइटेड |
| २००१-०२ | आर्सेनल |
| २०००-०१ | मॅंचेस्टर युनाइटेड |
| १९९९-०० | मॅंचेस्टर युनाइटेड |
| १९९८-९९ | मॅंचेस्टर युनाइटेड |
| १९९७-९८ | आर्सेनल |
| १९९६-९७ | मॅंचेस्टर युनाइटेड |
| १९९५-९६ | मॅंचेस्टर युनाइटेड |
| १९९५-९५ | ब्लॅकबर्न रोव्हर्स |
| १९९४-९४ | मॅंचेस्टर युनाइटेड |
| १९९२-९३ | मॅंचेस्टर युनाइटेड |

