नागपूर
Wikipedia कडून
| नागपूर | |
| जिल्हा | नागपूर जिल्हा |
| राज्य | महाराष्ट्र |
| लोकसंख्या | २४,२०,००० २००६-अंदाजे |
| दूरध्वनी संकेतांक | ०७१२ |
| टपाल संकेतांक | ४४०---- |
| वाहन संकेतांक | MH-३१, MH-४० |
| निर्वाचित प्रमुख | देवराव उमरेडकर (महापौर) |
| प्रशासकीय प्रमुख | लोकेश चंद्रा (महानगरपालिका आयुक्त) |
| संकेतस्थळ | http://www.enmc.org.in/ |
नागपूर हे महाराष्ट्र राज्याचे उपराजधानीचे शहर आहे व राज्यातील तिसरे मोठे शहर आहे. नागपूर हे भारतातील तेरावे मोठे नागरी क्षेत्र (urban conglomeration) आहे. नागपूर महाराष्ट्राच्या विदर्भ विभागातील सर्वात मोठे शहर, नागपूर जिल्हा व राज्याच्या नागपूर विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपुरात घेतले जाते. भौगोलिकदृष्ट्या देशाच्या मध्य भागात असलेल्या या शहरातच भारताचा शून्य मैलाचा दगड आहे. नागपुरास 'संत्रेनगरी' असेही संबोधतात कारण शहरातील संत्री प्रसिद्ध आहेत व संत्र्याची मोठी बाजारपेठ येथे आहे. नुकताच शहराचा ३००वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला.
अनुक्रमणिका |
भूगोल व हवामान
नागपूरचे क्षेत्रफळ २२० चौरस किलोमीटर असून समुद्रसपाटीपासूनची उंची ३१० मी आहे. समुद्रापासून दूर असल्यामुळे पावसाळ्याव्यतिरिक्त शहराचे हवामान शुष्क व थोडे उष्ण असते. शहरातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १,२०५ मिलिमीटर इतके आहे. पाऊस जून-सप्टेंबर महिन्यांदरम्यान पडतो. मार्च ते जून उन्हाळा असतो व मे महिन्यात पारा सर्वात वर असतो. या काळात नागपूरचे उच्चतम तापमान ४०° सेल्सियसपर्यंत वर जाते. हिवाळा नोव्हेंबर-जानेवारी महिन्यात असतो व तेव्हा शहराचे न्यूनतम तापमान १०° सेल्सियसच्याही खाली जाते.
इतिहास
नागपूरचा सर्वप्रथम उल्लेख १०व्या शतकातील ताम्रपटावर आढळतो. हा ताम्रपट देवाळी (वर्धा) येथे मिळाला असून तो इ.स.९४०चा आहे. छिंदवाडा जिल्ह्यातील देवगडचा गोंड राजा बख्त बुलंद शहा याने १७०२ साली नाग नदीच्या तीरावर नागपूर शहराची स्थापना केली. देवगड राज्यात त्या काळी नागपूर, सिवनी, बालाघाट, बैतूल आणि होशंगाबाद यांचा समावेश होत असे. बख्त बुलंद शहानंतर त्याचा मुलगा राजा चांद सुलतान देवगडच्या गादीवर आला. त्याने १७०६ साली त्याची राजधानी नागपुरास हलवली. त्याने जवळजवळ ३३ वर्षे राज्य करून नागपूर शहर भरभराटीस आणले.राजा चांद सुलतान याच्या मॄत्यूनंतर नागपूरवर भोसल्यांचे राज्य आले. १७४२ मधे रघूजीराजे भोसले नागपूरच्या गादीवर आरूढ झाले. १८१७ मधे सीताबर्डीच्या लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव करून ब्रिटिशांनी नागपूरचा ताबा घेतला. १८६१ मध्ये नागपूर सेन्ट्रल प्रॉव्हिन्सेस व बेरारची राजधानी करण्यात आली.
१८६७ मध्ये नागपूरहून मुंबई शहरापर्यंत ग्रेट इंडियन पेनिन्सुला कंपनीने रेलमार्ग विकसित केला आणि पहिली आगगाडी १८६७ मध्येच नागपूरहून निघाली. टाटा समूहाने देशातील पहिला कापड उद्योग याच शहरात सुरू केला. भारतीय स्वातंत्र्य युद्धातदेखील शहराने महत्त्वपूर्ण योगदान दिले. स्वातंत्र्यपूर्व काळात कॉँग्रेसची दोन अधिवेशने नागपुरात झाली व असहकार आंदोलन नागपूरच्या १९२०च्या अधिवेशनापासून सुरू झाले. स्वातंत्र्यानंतर सेन्ट्रल प्रॉव्हिन्सेस व बेरार भारतातील एक प्रांत बनला. १९५० साली मध्य प्रदेश राज्याची निर्मिती झाली व नागपूरला या राज्याची राजधानी होण्याचा मान मिळाला. १९५६च्या राज्य पुनर्रचना आयोगाने नागपूरसह वर्हाड(बेरार) बॉम्बे(मुंबई) राज्यात घातला. कालांतराने मे १, इ.स.१९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली व वर्हाड (विदर्भ)नव्या राज्यात आला. एके काळी देशाच्या भौगोलिक सुरक्षिततेच्या दृष्टीने नागपूरला भारताची राजधानी करण्याचाही प्रस्ताव होता. आज नागपूर महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असून महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन येथे भरते. १९५६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरमध्ये येऊन आपल्या लाखो अनुयायांबरोबर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.
नागपुरातील नामांकित संस्था
हे शहर महाराष्ट्राची उपराजधानी असल्यामुळे सुमारे दोन आठवडे चालणारे महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन येथे भरते. मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठदेखील येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेचे जन्मस्थान व मुख्यालय येथेच आहे.
नागपुरात अनेक राष्ट्रीय स्तराच्या सरकारी वैज्ञानिक संस्था आहेत- नॅशनल एनवायरन्मेंटल इंजिनियरिंग अँन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट (NEERI), सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कॉटन रिसर्च (CICR), नॅशनल रिसर्च सेंटर फॉर सायट्रस, नॅशनल ब्युरो ऑफ सॉइल-सर्वे ऍण्ड लॅंड-यूज प्लॅनिंग, जवाहरलाल नेहरू नॅशनल अल्युमिनियम रिसर्च अँन्ड डेवलपमेंट सेंटर, इंडियन ब्युरो ऑफ माइन्स, इंडियाज इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, नॅशनल अकॅडमी ऑफ डायरेक्ट टॅक्सेस, चीफ कंट्रोलर ऑफ एक्सप्लोसिव्ह्वज ऑफ द पेट्रोलियम अँन्ड एक्सप्लोसिव्ह्ज सेफ्टी ऑर्गनायझेशन, साउथ सेंट्रल झोन कल्चरल सेंटर व भारतीय हवामान खात्याचे विभागीय मुख्यालय.
भारतीय सैन्याच्या दृष्टीने नागपूर महत्त्वाचे आहे. भारतीय वायुदलाच्या निर्वहन (maintenance) विभागाचे मुख्यालय नागपुरात असून दारुगोळा कारखाना, स्टाफ कॉलेज या संस्थादेखील शहरात आहेत. नागपुरातील केंपटी (Kamptee) हे उपनगर भारतीय सैन्याने रेजिमेंटल सेंटर ऑफ इंडियन आर्मीज ब्रिगेडसाठी स्थापन केलेली लष्करी संस्था(कॅंटोन्मेंट बोर्ड) आहे. या लष्कर हद्दीत नॅशनल कॅडेट कॉर्प्स ऑफिसर्स ट्रेनिंग स्कूल, इन्स्टिट्यूट ऑफ मिलिटरी लॉ व इतर अनेक लष्करी संस्था आहेत. त्याचबरोबर नागपूरचे राष्ट्रीय नागरी संरक्षण महाविद्यालय भारत व परदेशातील विद्यार्थांना नागरी-रक्षण व आपत्कालीन व्यवस्थापनाचे शिक्षण देते. शहरात भारतीय वायुदलाच्या आय.एल-७६ या वाहतूक विमानांचा तळ(गजराज) आहे. नागपूरच्या भौगोलिक स्थानामुळे देशांतर्गत सर्व अंतराचे मोजमाप येथील सिविल लाइन्स या भागात असलेल्या शून्य मैलाच्या (zero milestone) दगडापासून केले जाते.
पर्यटनस्थळे
दीक्षाभूमी इथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बौध्द धर्म स्वीकारला होता. दीक्षाभूमी हा जगातील सर्वात मोठा पोकळ स्तूप आहे. अशोक दशमी/ आंबेडकर स्मृतिदिनी देशाभरातील दलित व बौद्धजन येथे भेट देतात.
सीताबर्डी किल्ल्यात १८१७ रोजी ब्रिटिश व भोसले साम्राज्यात मोठे युद्ध झाले होते. त्यात ब्रिटिश जिंकले व शहर त्यांच्या ताब्यात गेले. शहरातील प्रत्येक भागात मोठमोठी हिंदू प्रार्थनास्थळे असून रामनगर येथील श्री पोद्दारेश्वर राम मंदिर सर्वात प्रसिद्ध आहे. कोराडी येथील प्राचीन श्री महालक्ष्मी मंदिरात भक्तांची नेहमी आणि नवरात्राततर विशेष गर्दी असते. कॅथॉलिक सेमिनरी, बौद्ध ड्रॅगन प्लेसदेखील प्रसिद्ध आहेत.
शहरातील अंबाझारी, तेलंगखेडी, गांधीसागर, गोरेवाडा व सोनेगाव हे तलाव पर्यटकात प्रिय आहेत. पैकी अंबाझारी परिसरात रम्य उद्यान आहे. ते अगदी जुन्या काळापासून प्रसिद्ध आहे. भोसले शासकांनी विकसित केलेल्या महाराजबाग प्राणिसंग्रहालयात अनेक दुर्लभ प्राणी-पक्षी आहेत. पेंच संरक्षित वने (यांचा रुडयार्ड किपलिंग यांच्या जंगल-बुक या पुस्तकात उल्लेख आहे) नागपुरापासून ४५ किलोमीटर उत्तरेस आहेत.
विदर्भ क्रिकेट संघटनेचे मैदान हे देशातील कसोटी क्रिकेट खेळले जाणार्या ९ मैदानांपैकी आहे. वर्धा रस्त्यावर निर्माण होत असलेल्या नव्या मैदानात ८०,००० प्रेक्षकांची व्यवस्था असणार आहे. नागपुरात अनेक उपहारगृहे (हॉटेल) आहेत. तिथे भारतीय व आंतरराष्ट्रीय पद्धतीचे जेवण मिळते. लिबर्टी व स्मृती ही लोकप्रिय चित्रपटगृहे आहेत, शहरातील पहिले मल्टिप्लेक्स वर्धमाननगरात आहे तर आणखी तीन तयार होत आहेत. चित्रपटगृहात मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील चित्रपट प्रदर्शित केले जातात. नागपुरात्त हॉटेल टुली इंटरनॅशनल व हॉटेल प्राईड ही पंचतारांकित हॉटेल आहेत. सेंट्रल अँव्हेन्यू परिसरात अनेक लहान-मोठी उपहारगृहे आहेत.
लोकजीवन व संस्कृती
मराठी ही नागपुरातील सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे. मराठीची वर्हाडी बोलीभाषा विदर्भातील इतर भागांप्रमाणे येथेदेखील बोलली जाते. हिंदी व इंग्रजी या शहरातील इतर भाषा आहेत. इ.स.२००१ च्या जनगणनेनुसार नागरी लोकसंख्या २,१२९,५०० इतकी होती.
नुकतेच नागपूरला भारतातील सर्वात स्वच्छ व (बंगळूर नंतरचे) दुसरे सर्वात हिरवे शहर असल्याचा मान मिळाला आहे. नागपूरमध्ये जागेच्या किंमती अजूनतरी मर्यादेत आहेत. पण रामदासपेठ व सिव्हिल लाइन्स परिसरातल्या जागांचे भाव मात्र खूप जास्त आहेत. नागपूर महानगरपालिका पुरेसे पाणी पुरवते त्यामुळे येथे पाणीटंचाई नाही परंतु राज्यातील वीजटंचाईमुळे भारनियमन होते. शहरात वर्षभरात अनेक सण-उत्सव साजरे केले जातात. पोद्दारेश्वर राम मंदिर रामनवमीला भव्य शोभायात्रा आयोजित करते. उर्वरित भारताप्रमाणेच दिवाळी, होळी, दसरा हे सण जल्लोषात साजरे केले जातात. गणेशोत्सव व दुर्गापूजा हे सण अनेक दिवस चालतात. ईद, गुरुनानक जयंती, महावीर जयंती व मोहर्रम हे सणदेखील साजरे होतात.
नागपुरात वर्षभर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. महाराष्ट्र शासन आयोजित कालिदास महोत्सव आठवडाभर चालतो. या महोत्सवात अनेक संगीत-नृत्य विषयक कार्यक्रम होतात. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार त्यात भाग घेतात. संत्रनगरी क्राफ्ट मेळा, लोकनृत्य- महोत्सव हे कार्यक्रम दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्रातर्फे होतात. नागपूरकर भारतीय शास्त्रीय संगीताचे चाहते आहेत. पं.भीमसेन जोशी व इतर अनेक सुप्रसिद्ध कलाकार येथे बर्याचदा आपले कार्यक्रम करतात. मराठी नाटकांना नागपूरमध्ये मोठाच लोकाश्रय मिळतो.
नागपूर आकाशवाणी, नागपूर दूरदर्शन ही माध्यमे स्थानिक बातम्या, घडामोडी व कार्यक्रम प्रसारित करतात. लोकमत, सकाळ, तरुण भारत व लोकसत्ता ही मराठी दैनिके येथून निघतात. अनेक इंग्रजी व हिंदी वृत्तपत्रे येथे सहज मिळतात.
प्रमुख स्थळे
मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ व विधान भवन इत्यादी अनेक शासकीय कार्यालये सिव्हिल लाइन्स भागात आहेत. सिताबर्डीत शहराची प्रमुख बाजारपेठ आहे सिताबर्डीचा मुख्य रस्ता खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. याच भागात सिताबर्डी किल्ला आहे. धर्मपीठ येथे मोठी दुकाने, उपहारगृहे व कृषी उत्पन्नाची बाजारपेठ आहे. रामदासपेठेत अनेक कार्यालये व दुकाने आहेत. इतवारी येथे मालाच्या किरकोळ विक्रीची बाजारपेठ आहे. महल हा शहराचा जुना भाग असून येथे छोट्या गल्ल्या असल्याने फार गर्दी असते. कलामना येथे संत्री व धान्ये यांची मोठी बाजारपेठ आहे.
अर्थव्यवस्था
नागपूर हे विदर्भातील महत्वाचे व्यावसायिक केंद्र आहे. अलीकडील काही वर्षात नागपुरात गुंतवणूक वाढत असून येथील अर्थव्यवस्था विस्तारत आहे. इ.स.२००४ साली नागपुरात रु. ५,००० कोटी इतकी गुंतवणूक झाली आहे. नागपुरातील आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ मालसामान व प्रवासी केंद्राची (मल्टिमॉडल इंटरनॅशनल हब एरपोर्ट ऍट नागपूर-MIHAN) निर्मिती होत आहे. हा प्रकल्प आग्नेय व मध्य-पूर्व आशियातील सामान-वाहतुकीकरिता महत्त्वाचा थांबा (break of bulk) बनणार आहे. विमाने बनवणार्या जगप्रसिद्ध बोइंग कंपनीने नागपुरात १८.५ कोटी डॉलर भांडवलाचा प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
क्षेत्रफळानुसार बुटिबोरी आशियातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत आहे. बुटिबोरीतील सर्वात महत्त्वाची संस्था म्हणजे इंडो-रामा सिंथेटिक्स आहे तर केईसी, ह्युंदाई, एसीसी निहोन कास्टिंग्ज, अनेक टेक्सटाइल उद्योग, विडियोकॉन हे इतर मुख्य प्रकल्प येथे आहेत. अनेक मध्यम आकाराचे उद्योग व महाराष्ट्रातील पहिले फूड पार्क येथे आहे. मुंबई-ठाणे-पुणे औद्योगिक पट्ट्याची क्षमता जवळजवळ संपल्यामुळे बुटिबोरी वसाहतीत अनेक उद्योग येत आहेत.
शहरातील पश्चिम भागातील हिंगणा औद्योगिक वसाहतीत जवळजवळ ९०० लहान व मध्यम आकाराचे उद्योग आहेत. महिंद्र आणि महिंद्र, नेको कास्टिंग, बजाज ऑटो ग्रुप, कॅंडिगो, अजंता टुथब्रशेस, सन्विजय ग्रुप, विको लेब्रॉरेटरीज, दिनशा, हल्दीराम हे उद्योग विशेष उल्लेखनीय. शहराचे भौगोलिक स्थान, सोयी-सुविधा, स्वस्त मनुष्यबळ यामुळे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात पुणे-मुंबई नंतर नागपूरलाच पसंती दिली जाते. नागपुरात १०,००० कोटी रुपये गुंतवणूक असलेले विशेष आर्थिक क्षेत्र (एसईझेड) सुरू करण्याचा प्रस्ताव आहे.
शिक्षण
नागपूर मध्यवर्ती भारतातील प्रमुख शैक्षणिक केंद्र असून देशभरातून विद्यार्थी येथे शिक्षण घ्यायला येतात. नागपूरमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आहे. शहरात तीन वैद्यकीय महाविद्यालये आहेत. आय.एम.टी. व देशातील एकमेव अग्नि-अभियांत्रिकी संस्थेसह अनेक अभियांत्रिकी महाविद्यालये येथे आहेत.
नागपुरातील शिक्षण संस्थांमधून मराठी, इंग्रजी व हिंदी माध्यमातून शिक्षण मिळते. येथील शाळा महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न आहेत. केंद्रीय बोर्डाचा (CBSE) अभ्यासक्रम शिकवणार्या शाळा शहरात हळूहळू सुरू होत आहेत. येथील महाविद्यालये राष्ट्रसंत त्तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिकारक्षेत्रात येतात. नागपुर शहराची साक्षरता ८९.३% आहे.
नागपुरातील काही महत्त्वाच्या शिक्षण संस्था
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
- इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
- एन.के.पी. साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस
- व्ही.एन.आय.टी. अभिमत विद्यापीठ
- कृषि महाविद्यालय
- एल.आय.टी व कमला नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालय
- शिवाजी विज्ञान महाविद्यालय
- हिस्लॉप महाविद्यालय
- आय.एम.टी. व्यवस्थापन संस्था
वाहतूक व्यवस्था
रेल्वे
नागपुराच्या भौगोलिक स्थानामुळे येथील रेल्वे स्थानक महत्त्वाचे जंक्शन बनले आहे व देशातल्या कानाकोपर्यात जाणार्या रेल्वे गाड्या (विशेषत: मुंबई, दिल्ली, चेन्नई व कोलकाता या महानगरांना जोडणार्या) येथून जातात. नागपूर रेल्वे स्थानकाबरोबरच अजनी, इटवारी, कलामना, कामटी व खाप्री ही स्थानके शहाराच्या जवळ आहेत.
रस्ते वाहतूक
भारतातील दोन महत्त्वाचे राष्ट्रीय महामार्ग (कन्याकुमारी-वाराणसी क्र.७) व (हाजिरा- कोलकाता क्र.६) नागपुरातून जातात. तसेच महामार्ग क्र.६९ नागपूर-भोपाळ येथूनच सुरू होतो. दोन आशियाई महामार्ग ए.एच ४७- आग्रा-मटारा (श्रीलंका) व ए.एच ४६ खरगपूर-धुळे येथून जातात. नागपूर आपल्या चांगल्या दर्जाच्या रस्त्यांसाठी प्रसिद्ध आहे. नागपूर इनलॅंड पोर्ट हे देशातील सर्वाधिक वेगाने विस्तारणारे अंतर्गत बंदर (Inland port) ठरले आहे.शहरातल्या शहरात वाहतुकीचा प्रश्नमात्र येथील रहिवाशांना भेडसावत आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची सेवा नागरी व ग्रामीण जनतेस अपुरी ठरत आहे इंटिग्रेटेड बस व मोनोरेल प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे.
विमान वाहतूक
नागपुरातील विमानवाहतूक नियंत्रण केंद्र देशातील सर्वात व्यस्त आहे व ३०० हून जास्त उड्डाणे शहरावरून होतात. देशातर्गत विमानवाहतूक सेवा इंडियन एयरलाइन्स, जेट, एयर डेक्कन इत्यादी नागपूरला मुंबई, दिल्ली, हैद्राबाद व कोलकाता या शहरांना जोडतात. १ ऑक्टोबर २००५ रोजी नागपुरातील सोनेगाव विमानतळास आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात आला व त्याचे नामकरण डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ असे करण्यात आले. नागपूर हा मध्यवर्ती भारतातील महत्त्वाचा विमानतळ असून एयर अरेबिया (शारजा), इंडियन एअर लाइन्स(बँकॉक), कतार एयरवेज (दोहा)(नियोजित) यांची आंतरराष्ट्रीय उड्डाणे येथून होतात.
नागपूर देशातील हवाई नकाशावर महत्त्वाचे स्थान मिळवीत आहे. मल्टी मॉडेल इंटरनॅशन्ल कार्गो हब (MIHAN)ची निर्मिती इ.स.२००६ मध्ये पूर्ण झाली असून या मालवाहतूक प्रकल्पामुळे नागपूर शहराची तसेच विदर्भ विभागाची आर्थिक प्रगती जोमाने होईल. बोइंग कंपनीने १८.५ कोटी अमेरिकन डॉलर गुंतवणूक करुन नागपुरात निर्वहन केंद्र उभारण्याचे योजले आहे.
हेसुद्धा पहा
बाह्य दुवे
- नागपूर शहराचा नकाशा
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
- नागपूर एन.आय.सी
- नागपूर पर्यटन-विकिट्रॅवल
| महाराष्ट्र राज्य | |
|---|---|
| जिल्हे | नागपूर • चंद्रपूर • भंडारा • गोंदिया • गडचिरोली • अमरावती • अकोला • वाशिम • हिंगोली • नांदेड • वर्धा • यवतमाळ • बुलढाणा • ठाणे • मुंबई उपनगर • मुंबई जिल्हा • रायगड • रत्नागिरी • सिंधुदुर्ग • नाशिक • अहमदनगर • पुणे • सातारा • सांगली • कोल्हापूर • नंदुरबार • धुळे • जळगाव • औरंगाबाद • जालना • परभणी • बीड • लातूर • उस्मानाबाद • सोलापूर • |
| मुख्य शहरे | • औरंगाबाद • कोल्हापूर • ठाणे • नवी मुंबई • नाशिक • नागपूर • पुणे • पिंपरी चिंचवड • मुंबई • सोलापूर • |

